मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ; मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी?
मुंबई विद्यापीठातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे. मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, जवळपास दहा एकर जागा वापरण्यात आली असल्याचा आरोप युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी केला आहे. या दोघांनी पत्राद्वारे ही बाब कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिली असून सदर आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
युवासेना माजी व्यवस्थापन परीषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी कुलुगुरु यांना लिहीले पत्र जसेच्या तसे
दि.१९ जानेवारी,२०२४
प्रति,
मान.प्रा.(डॉ.)रविंद्र कुळकर्णी,
कुलगुरु,
मुंबई विद्यापीठ, मुंबई
यांसी सस्नेह जय महाराष्ट्र!
विषय: मुंबई विद्यापीठ कलीना कॅम्पस येथील मोकळी जागा व्यावसायिक कामाकरीता देणेबाबत.
महोदय,
आम्ही युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य,मुंबई विद्यापीठ,मुंबई उपरोक्त विषयास अनुसरून अशी मागणी करीत आहोत की,मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे गेलो असता असे निदर्शनास आले की,रविवार दि.२१जानेवारी,२०२४ रोजी होऊ घातलेल्या मुंबई मॅरेथॉन करीता विद्यापीठाची मोकळी जागा भाड्याने वापरास देण्यात आली आहे वास्तविक याकरीता विरोध करण्याचा अजिबात हेतु नव्हता परंतु हि प्रसिध्द मुंबई मॅरेथॉन खाजगी आहे (शासकीय नाही)आणि मुंबई विद्यापीठाची जागा व्यावसायिक कामाकरीता (कमर्शिअल स्टॉल)वापर केला जात आहे,(उदा.एक लाख भाडे देणार आणि कमर्शिअल स्टॉल कडून दोन चार लाख उकळणार) यापूर्वी देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या लष्कर भरती साठी आपण भाड्याने जागा देण्याचा प्रस्ताव पारित केला होता परंतु जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्तीमुळे मोफत देण्यात आली,हि बाब विद्यापीठास भूषणावह नाही.
मुंबई मॅरेथॉन करिता देण्यात आलेल्या जागेमुळे विद्यापीठातील सर्व रस्त्यांवर खुप गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील अडचणी होत आहेत तरी सदर जागेचा व्यावसायिक कामाकरीता वापर करण्यास मज्जाव करण्यात यावा, खरंतर मुंबई विद्यापीठ प्राधिकरणात एकही विद्यार्थी प्रतिनिधी नसल्यामुळे असे विद्यार्थ्यांना मारक निर्णय घेण्यात येत असल्याचा आमचा मानस आहे तरी आपण याबाबत सविस्तर चौकशी करुन व्यावसायिक वापरास मज्जाव करण्यात यावा अशी मागणी करीत आहोत.
धन्यवाद!
आपले नम्र,
प्रदीप सावंत राजन कोळंबेकर