कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत. कारण जागा वाटपाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. युतीच्या जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून असलेल्या तणाव दूर करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. जागावाटपाचं ठरलंय, युतीबाबत काळजी करू नका, असे त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटल यांच्यासोबत कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगतिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे लोकसभा उपाध्यक्षपदाबाबतही त्यांनी युती दोन-चार पदांसाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच युती तुटू देणार नसल्याची ग्वाहीदेखील उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यान, लोकसभा निवडणूक विजयानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांसह कोल्हापुरात येऊन अंबाबाईचं दर्शन घेतलं. ठाकरे कुटुंबीयांसह यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. ढगाळ हवामानामुळे उद्धव ठाकरेंचं विमान कोल्हापुरात उशीरा दाखल झाले. 



उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी कोल्हापुरात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंनी त्यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आजच मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर रविवारपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर जाणार आहेत. तर आदित्य ठाकरेही पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत.