गणपती मंडळात कार्यकर्त्यांना जुगार खेळू द्या, लोकप्रतिनिधींची अजब मागणी
गणेशोत्सवात गणपती मंडळामध्ये कार्यकर्त्यांना पत्ते खेळू द्या अशी अजब मागणी आमदार खासदारांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनीच असे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबई : गणेशोत्सवात गणपती मंडळामध्ये कार्यकर्त्यांना पत्ते खेळू द्या अशी अजब मागणी आमदार खासदारांनी केली आहे. लोकप्रतिनिधींनीच असे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गणेश उत्सव आणि बकरी ईदनिमित्त पोलिसांनी बुधवारी औरंगाबादमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत, लोकप्रतिनिधी म्हणून औरंगाबादमधील शिवसेना, भाजप, एमआयएमचे आमदार, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त उपस्थित होते. या बैठकीतच लोकप्रतिनिधींनी ही अजब मागणी केली आहे.
गणेशोत्सवात गणपती मूर्तीचे रक्षण करण्यासाठी तसेच रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्ते रात्रभर जागरण करतात. रात्री जागे राहण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते मंडपात पत्ते खेळतात. त्यामुळे पत्ते खेळणा-यांकडे दुर्लक्ष करा. जुगार खेळणे त्यांचा उद्देश नाहीये असे म्हणत एक प्रकारे जुगाराला प्रोत्साहनचं दिल्याचं पहायला मिळत आहे.
नोटबंदीमुळे वर्गणी देण्यासाठी अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे मंडळांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. रात्री मूर्तीच्या रक्षणासाठी जागर करीत असाल तर पत्ते खेळा, पण जुगारात मिळालेला पैसा स्वत:वर खर्च न करता त्यातून गणेशमंडळाचा खर्च भागवा असेही लोकप्रतिनिधींनी म्हटलं आहे.