अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : लॉकडाऊनमध्ये राज्यभरात अनेकांना महावितरणच्या जास्त वीज बिलाचा फटका बसला. अनेकांनी ही वाढीव बिल भरली देखील. यातून सर्वांना दिलासा मिळेल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले पण अजूनही हे प्रकार संपत नसल्याचे दिसतय. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लेहेगाव रेल्वे येथील सुखदेव मालखेडे या मजूराला तब्बल पन्नास हजारांचं बिल महावितरणने पाठवलंय. त्यामुळे बिलाचे पैसे आणायचे कुठुन ? असा प्रश्न मजुरी करणाऱ्या या परिवाराला  पडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालखेडे हे मजुरी करुन कुटूंबासोबत आपल्या पडक्या घरात राहतात. या कुटूंबाला सप्टेंबर महिन्याच्या बिलाचा आकडा ४९,२०० रुपये इतका आला. आपण इतकी वीज कधी वापरली ? असा प्रश्न त्यांना पडलाय. त्याच्या बिलावर त्यांनी १०७ युनिटचा वापर केल्याचं दिसतंय. 


वापरलेलं युनिट त्याला आकारलेले पैसे यात मोठी तफावत आलेल्या बिलात आहे. मग इतकं विद्युत बिल कसं आलं ? हा प्रश्न पडल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. 



महत्वाच म्हणजे या गावात सतत विजेचा लपंडाव सुरु असतो. तरी देखील महावितरण ग्राहकांना भरमसाठ विद्युत बिल देतेय. त्यामुळे सामान्य माणसांना महावितरण कडून एकप्रकारची शिक्षा तर दिली जात नाहीये ना ? असा प्रश्न लेहेगाव वासीयांना पडला आहे.