ॲम्ब्युलन्स निघाली नवसाला, आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
रुग्णांना वाऱ्यावर सोडून आरोग्य यंत्रणेची रुग्णवाहिका भाविकांना घेऊन पूजेसाठी
अनिरुद्ध दवाळे, झी मराठी, अमरावती : मेळघाटातील आरोग्य यंत्रणा कुपोषणासाठी सज्ज, हेच ब्रीदवाक्य घेऊन कार्य सुरू असल्याचा कांगावा नेहमी केला जातो. मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे. मेळघाटमधल्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
मेळघाटातील अति दुर्गम असलेल्या हतरु प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट 45 किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
कुपोषणाचा कलंक असलेल्या मेळघाटात उन्हाळ्यापासूनच पावसाळ्यात उद्भवणार्या समस्या आणि सर्व प्रकारच्या आजारापर्यंत नियोजन केलं जात असल्याचं बोललं जातं. पण प्रत्यक्षात मेळघाटात गर्भवती आणि इतर अपघाती रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याचं वास्तव चित्र आहे.
अति दुर्गम असलेल्या हतरु प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका रुग्णांना वाऱ्यावर सोडून सोमवारी कोयलारी इथस्या सोमेश्वर भोले मंदिरात नवसाच्या पूजेसाठी भक्तांना घेऊन आली होती. दुपारी बारा वाजता आलेली ही रुग्णवाहिका सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान परत गेली असल्याची माहिती आहे.
या घटनेची गंभीर दखल घेतली असून मेळघाट विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडे आणि डॉ. प्रधान यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची सत्यता तपासण्यात येईल आणि त्यानंतर आरोग्य अधिकारी आणि वाहन चालक यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रनमले यांनी दिली आहे.