MIDCची चूक कुटुंब उद्ध्वस्त! जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू
अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या एका चुकीचा फटका दोन कुटुंबांना बसला. हसती-खेळती दोन लहान मुलं कुटुंबाला सोडून कायमची गेली. ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अन्यथा अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला
चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : एमआयडीसी (MIDC) ठेकेदाराच्या (Contractor) निष्काळजीपणाचा फटका अंबरनाथमधल्या (Ambernath) दोन कुटुंबांना बसला आहे. घरातील हसती-खेळती मुलं अचानक सोडून गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंबरनाथ तालुक्यात एम.आय.डी.सी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप चिमुरड्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला केवळ आकस्मात मृत्यूची नोंद केल्याने संतापाचं वातावरण होतं. जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा आक्रमक पवित्रा दोन्ही मुलांच्या कुटुंबियांनी घेतला.
काय आहे नेमकी घटना?
अंबरनाथ तालुक्यातील डावलपाडा-वसार रोड परिसरात एमआयडीसीच्या जलवाहिनी (Water Channel) टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र काम झाल्यावर तो खड्डा बुजवण्यात आला नाही. अवकाळी पाऊस आणि जलवाहिनीमुळे खड्ड्यात पाणी साचलं. या खड्ड्याजवळ खेळत असताना 6 वर्षांचा सनी यादव आणि 8 वर्षांचा सुरज राजभर ही मुलं खड्ड्यात पडली. खड्डा पाच फुटांपेक्षा जास्त खोल असल्याने त्यांना वरती येता आलं नाही. परिणामी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागात एमआयडीसीच्या चौथी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे , ही जलवाहिनी जोडण्यासाठी टी सर्कलला एक 7 ते 8 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा गेल्या काही दिवसापासून तसाच होता ,या खड्ड्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी तसेच आजूबाजूच गटाराचे पाच ते सहा फूट पाणी जमा झालं होतं.
काल संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास या साचलेल्या पाण्यात 6 वर्षीय सनी यादव आणि 8 वर्षीय सुरज राजभर हे दोन चिमुरडे पाण्यात खेळत होते , मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते या पाण्यात बुडाले , दुपारची वेळ असल्याने आजूबाजूची दुकान बंद होती तसंच रस्त्यावर रहदारी ही नव्हती. त्यामुळे कोणीही त्यांच्या मदतीसाठी येऊ शकले नाही. परिणामी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ठेकेदारांने ही जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डा खोदला होता मात्र काम झाल्यावर तो खड्डा त्याने बुजवला नाही तसंच कोणतीही सुरक्षेची खबरदारी घेतली नाही , त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे .