MSRDC  MD Anil Gaikwad : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी एलॉन मस्क, सुंदर पिचाई यांच्या अनेक आंतरराष्ट्रीय उद्योजकांची भेट घेतली.  अमेरिकेच्या 60 व्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यासाठी अनिलकुमार गायकवाड यांना विशेष निमंत्रण मिळाले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांतील प्रगतीचे यश आणि भविष्यातील योजनांबाबत जागतिक स्तरावर चर्चा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MSRDC मार्फत राज्यात विविध महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात लक्षवेधी भरारी घेतली आहे. समृद्धी महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, मंत्रालय पुनर्बांधणी आणि भारतातील सर्वात लांब रस्त्यावरील बोगदा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले. या प्रकल्पांनी राज्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवीन स्वरूप दिले असून आर्थिक प्रगतीसाठी मार्ग सुकर केला आहे. या महत्वाच्या प्रकल्पांमध्ये अनिलकुमार गायकवाड यांचे मोलाचे योगदान आहे. 


अमेरिकेतील राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यात अनिलकुमार गायकवाड यांनी यांनी एलॉन मस्क (टेस्ला), सुंदर पिचाई (गूगल), मसायोशी सोन (सॉफ्टबँक) यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत प्रकल्पांतील गुंतवणुकीच्या संधींबाबत तसेच राज्याच्या प्रगत धोरणांची माहिती दिली. यावेळी त्यांनी शाश्वत शहरी विकास, अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन, तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी असलेल्या संधींबाबत देखील चर्चा केली.


"जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा मोठा सन्मान आहे. जागतिक नेत्यांसोबत झालेल्या संवादातून मिळालेला अनुभव महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना नवीन दृष्टीकोन प्रदान करेल. आमचे ध्येय महाराष्ट्राला शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणारे राज्य बनविणे आहे अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली.