नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विधानसभा निवडणूक भाजप-शिवसेना एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसंच शिवसेनेसोबतचं जागावाटप लवकरच पूर्ण करा. राज्यातील दोन्ही नेतृत्वाने चर्चा करून ठरवावं, अशा सूचनाही अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. यानंतर शिवसेना सुरुवातीला विरोधी पक्षात बसली. मग पुन्हा एकदा भाजपसोबत युती झाल्यानंतर शिवसेना सत्तेत आली. यानंतरही दोन्ही पक्षांमध्ये वारंवार वाद झाले. या दोन्ही पक्षातल्या वादाने टोक गाठल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी युती होणार नाही, असं वाटत होतं. पण अमित शाह मातोश्रीवर आले आणि लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय झाला. विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना समसमान संधी मिळतील, असं दोन्ही पक्षांचे नेते सांगत आहेत. पण विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय आहे? हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.