उद्धव ठाकरे आणि अमित शहा भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा?
भाजपनं शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सर्व बाजुनं प्रयत्न चालवले आहेत.
मुंबई : भाजपनं शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी सर्व बाजुनं प्रयत्न चालवले आहेत. त्याचाच भाग म्हणून भाजपनं आता शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद देण्याची तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. जुलैमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळी शिवसेनेचा विचार होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर शिवसेनेला राज्यसभा उपसभापतीपदही दिलं जाण्याची शक्यता आहे. आज अमित शाह मातोश्रीवर जाणार आहेत. या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेनं लोकसभा निवडणूक युती करून लढावी, असी भाजपा नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेगलू देसमच्या वाट्याची मंत्रिपदं अन्य मित्रपक्षांना दिली जाण्याची शक्यता असून यात शिवसेनेला आणखी एका मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. मात्र शिवसेना भाजपची ही ऑफर स्वीकारणार का? याकडे लक्ष लागलंय. तर दुसरीकडे नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलालाही मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.