Maharashtra Politics : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचाबाबत केलेल्या विधानाने राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलं आहे. राज्यपालांना परत पाठवा अशी मागणी सातत्याने राज्यभरातून केली जातेय. त्यानंतर आता राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहीत आपल्या विधानाचा खुलासा केला आहे. महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलंय. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शंका उपस्थित केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"याला पश्चात बुद्धी शहाणपण म्हणावं की, खरोखर ही भावना आहे याविषयी मनात शंका यायला जागा आहे. पत्रावर तारीख 6 डिसेंबर आहे ते आता माध्यमांसमोर आणण्याचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर बाकी आहे. राज्यपाल म्हणत असतील की त्यांच्या मनात अशी कोणतीही भावना नाही तर वारंवार ही वक्तव्ये का होतात याचेसुद्धा उत्तर जनतेला अपेक्षित आहे," असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.


राज्यपालांनी पत्रात काय म्हटलंय?


"माझ्या भाषणातील एक छोटा अंश काढून काही लोकांनी भांडवल केले. मी म्हणालो की, मी शिकत होतो तेव्हा महात्मा गांधीजी, पंडित नेहरुजी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादींना विद्यार्थी आदर्श मानत. हे सारे आदर्श आहेत. पण, युवापिढी वर्तमान पिढीतील आदर्श सुद्धा शोधत असतेच. त्यामुळेच मी असे म्हणालो की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते अगदी अलिकडच्या काळातील नितीन गडकरी हेही आदर्श असू शकतात.  याचाच अर्थ डॉ. एपीजे अब्दुल कलाम, होमी भाभा या सुद्धा अनेक कर्तव्यशील व्यक्तींचा युवा पिढीला आदर्श राहू शकतो. आज संपूर्ण जगात भारताचा लौकिक वाढविणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा आदर्श विद्यार्थ्यांसमोर राहू शकतो, याचा अर्थ महापुरुषांचा अवमान करणे असा तर होत नाही. येथे कुठेही तुलना करणे हा विषयच असू शकत नाही," असे राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.


छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत 


"आता जेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे, ते केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे गौरव आहेत. कोरोनाच्या काळात, जेथे अनेक ‘महनीय’ आपल्या घरातून बाहेर निघत नव्हते, तेव्हा मी या वयात सुद्धा शिवनेरी, सिंहगड, रायगड, प्रतापगडासारख्या पवित्र स्थळांवर पायी जाऊन दर्शन घेतले.  छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूर पुत्राला जन्म देणार्‍या वंदनीय माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी सिंदखेडराजा येथेही गेलो. गेल्या 30 वर्षांत त्याठिकाणी जाणारा मी पहिला राज्यपाल असेन. तेथे मी हवाई मार्गाने नाही, तर मोटारीने गेलो. माझ्या कथनाचा मतितार्थच हा होता की, छत्रपती शिवाजी महाराज हे सदासर्वकाळासाठी प्रेरणास्त्रोत आहेत," असेही राज्यपालांनी म्हटलं आहे.