हेमंत चापुडे, झी २४ तास, जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे कोल्हेंची महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात ओळख आहे. नुकतीचं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी २०१९ लोकसभा निवडणूक जिंकली. शिरूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोल्हेंनी दणदणीत पराभव केला. अमोल कोल्हे यांचा विजय व्हावा यासाठी प्रत्येक जण आपापल्या परिनं त्यांच्या प्रचारात सहभागी होत होता. यामध्ये त्यांचा चाहत्या वर्गाचाही मोठा समावेश होता. यापैंकीच त्यांच्या एका चाहत्यानं डॉक्टर अमोल कोल्हे जोपर्यंत खासदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदाशिव बेले असं त्याचं नाव आहे. बेले हे धामनगाव (तालुका वसमत) येथील रहिवासी आहेत. लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सदाशिव यांनी कोल्हेंच्या विजयासाठीचा पण केला होता आणि तो पूर्णदेखील केला. जवळपास दोन महिने ते सर्वत्र अनवाणीच प्रवास करत होते. मराठवाड्यातील ४२-४५ अंश सेल्सिअस तापमानात अनवाणी पायांनी फिरणं तशी सोपी गोष्टी नव्हती. या दरम्यान त्यांच्या पायांना जखमादेखील झाल्या. पण अमोल कोल्हेंवरच्या प्रेमापोटी त्यांनी आपला निर्धार पूर्ण केला.


सदाशिव बेले अमोल कोल्हेंसोबत

गावातील अनेक जण त्यांची चेष्टा करत होते पण ते सर्वांना एकच गोष्ट सांगत होते की, 'माझ्या संभाजी महाराजांना ज्या कलम कसायांनी इतिहासात बदनाम करण्याचं काम केलं. त्याला पुसून खरा इतिहास जनतेपुढे माडूंन लहानांपासून-थोरांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या कामावर प्रभावित होऊन मी दोन महिने अनवाणी चालण्याचा निर्धार केला आहे'.


२३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यावेळेस सदाशिव यांनी आपल्या धामनगावात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यांच्या मित्रांनी गुलाल उधळत जंगी मिरवणूकदेखील काढली. चाहत्याची ही कहाणी कोल्हेंपर्यंत पोहोचवण्याचं कार्य म.से.सं.संभाजी बिग्रेडचे नेते रमेश हांडे यांनी केलं. यानंतर कोल्हे यांनी सदाशिव यांनी नारायणगावात बोलावणं धाडलं आणि चाहत्याची मनापासून भेट घेतली.



यावेळेस अमोल कोल्हेंनी स्वत:च्या पायातील चप्पल सदाशिव बेल्हे यांनी दिली. त्यांना पेढा भरवला आणि प्रेमपूर्ण अलिंगन देत त्याचा सन्मान करत मनापासून आभारदेखील मानले.