Amol Mitkari On Tanaji Sawant Controversial Statement: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून रणनिती आखण्यात येत आहे. जागावाटपाच्या चर्चा असतानाच महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चांनाही उधाण येत आहे. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळं या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.  तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळं  राष्ट्रवादीत नाराजी पसरली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे. महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाहीये, अशी टीका देखील केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत तानाजी सावंत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तानाजी सावंत ही व्यक्तीच संशोधनाची व्यक्ती आहे. हाफकीन संस्था आहे की माणून हे त्या व्यक्तीला माहीत नाही, खेकडा धरण फोडू शकतो असा शोध लावणारी व्यक्ती काहीही बोलू शकतात, असा टोला अमोल मिटकरींना लगावला आहे. तसंच, त्यांच्या पोटात राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची मळमळ असेल तर त्यांनी बुमपरांड्यातील साखर कारखाण्याच्या उदघाटनाला अजित पवारांना कशाला बोलावलं? असा सवालही मिटकरींनी केला आहे. 



अमोल मिटकरी यांनी एक ट्विटदेखील केल आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांसोबत तानाजी सावंत यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मिटकरी पुढे म्हणतात की, उदघाटनाला बोलवायचं आणि राष्ट्रवादीशी पटत नाही असं जनतेला सांगायच. मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज द्यावी, असंही मिटकरींनी म्हटलं आहे. तोंडाचे पट्टे चालवणारी ही पाचवी व्यक्ती आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतला नाही,असा इशाराही मिटकरींनी दिला आहे. 


काय म्हणाले होते तानाजी सावंत?


धाराशिव येथील एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत राष्ट्रवादीबाबत एक विधान केलं होतं. मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही, असे ते म्हणाले होते.