मुंबई : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन नुकताच पार पडलं. हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधकांच्या घोषणांमुळे चर्चेत राहिलं. या घोषणाबाजीनंतर शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेत शिंगावर आलात तर अंगावर घेऊ असं म्हणत विरोधकांना जाहीर आव्हान दिलं होतं. एकीकडे गोगावलेंनी दिलेलं आव्हान आणि बैलपोळ्याच्या सण याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बैलपोळ्याला शेतकरी बैलांना रंगरंगोटी करून मस्त सजवतात. मिटकरी यांनी अशाच एका रंगरंगोटी केलेल्या बैलाचा फोटो ट्विट केला आहे. त्या फोटोमधील बैलाच्या पोटावर, '50 खोके OK', असं लिहिलं आहे. त्यासोबतच मिटकरींनी आपल्या कॅप्शनमध्ये, आता काय या बैलाला शिंगावर घेणार का?, मी तर म्हणतो आणि घेऊनच बघा, असं म्हणत सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे. 



पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी विरोधी आमदारांनी, पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा,अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला, लवासाचे खोके बारामती ओक्के, अशा घोषणा शिंद गटातील आणि भाजपच्या आमदारांनी दिल्या होत्या.


काय म्हणाले होते महेश गोगावले
आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही मात्र जर अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. आम्हाला डिवचलं तर आम्ही कोणालाही सोडणार नाही, आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत, असं महेश गोगावले म्हणाले होते.


दरम्यान, अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेला फोटो व्हायरल झाला आहे. यावर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.