अमरावती : Amravati love marriage News :अतिशय धक्कादायक बातमी. आंतरजातीय लग्न केल्याच्या रागातून मुलीच्या आईवडिलांनीच मुलीला मारहाण केली आणि तिला नवऱ्याच्या घरातून अक्षरशः फरफटत आणले. अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातल्या अंबाडा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, 'झी 24 तास'च्या दणक्यानंतर पोलिसांनी मुलीची आई-वडिलांच्या ताब्यातून सुटका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

28 एप्रिलला आर्य समाज मंदिरात दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर 4 मे रोजी मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला मारहाण केली आणि तिला जबरदस्तीने मुलाच्या घरातून फरफटत घरी नेले. या प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही, असा आरोप नवऱ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 


मुलीला आईवडिलांच्या तावडीतून पोलिसांनी सोडवले


मुलीने आंतर जातीय प्रेम विवाह केल्याने चिडलेल्या आईवडिलांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण करत फरपटत नेल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील अंबाडा या गावात घडली. सावरखेड येथील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येथे आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. त्यानंतर मुलगी 4 मे रोजी घरातून मुलांकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना समजताच मुलीकडील दहा ते बारा जण अंबाडा येथे पोहोचले आणि त्यांनी मुलीला फरपटत, मारहाण करत उचलून नेले. याबाबत  'झी 24 तास'ने वृत्त दाखवताच पोलिसांनी याची दखल घेतली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुलीला आई-वडिलांच्या ताब्यातून सोडवले.


तरुणाने आपल्या पत्नीला मारहाण करुन नेल्याची तक्रार मोर्शी पोलीस ठाण्यात केली. मात्र गेले तीन दिवसात पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. मात्र काल रात्री उशिरा युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणलेले. या ठिकाणी या मुलीचे इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात येणार आहे.