अमरावती : मंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे. अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. आमदार रवी राणा यांनी कुजलेलं सोयाबीन जाळून शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी आर्थिक मदत देण्याचा ठराव जिल्हा नियोजन बैठकीत ठराव घेण्याची मागणी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुद्द्यावरुन बैठकीत रवी राणा व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची चांगलीच खंडाजंगी झाली होती. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी फेसबुक लाईव्ह करत आमदार रवी राणा यांनी एका शाळेची जमीन आणि मेळघाटातील आदिवासीची जमीन हडपल्याचा आरोप केला होता. 


मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या या आरोपांना आता रवी राणा यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. यशोमती ठाकूर यांनी 15 दिवसात माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल अन्यथा यशोमती ठाकूर यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा असं खुलं आव्हान रवी राणा यांनी दिलं आहे.


दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही आमदार रवी राणा यांनी दिला आहे.


बैठकीत काय घडलं होतं


अमरावती जिल्हा नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार रवी राणा यांनी दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी आवाज चढवला. यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांना आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही असं सांगत संताप व्यक्त केला. रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने जिल्ह्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.