पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू, पुरानं अन्नाची नासाडी, शेती पाण्याखाली
आभाळ फाटलं...पुरानं उभं राहिलेलं पिकही गेलं, घरातल्या पाण्यानं अन्नाची नासाडी झाली... बळीराजानं डोक्याला लावला हात
अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती : अमरावती जिल्ह्यामध्ये रात्रभर संततधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि पूरस्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर आला. चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड या गावातून वाहणाऱ्या नदीला पूर आल्याने गावातील अनेक घरात पाणी शिरलं.
जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शिरलं होतं. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील धान्याची नासाडी झाली. खायचं काय असा प्रश्न पुढे आला, संततदार पावसामुळे शेतीचंही मोठे नुकसान झाला आहे.
सोयाबीनच्या शेतात पाणी शिरल्याने परिसरातील अनेक हेक्टर सोयाबीनचे शेत पाण्याखाली गेले. त्यामुळे तूर, सोयाबीन, संत्रा आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांची मालिका संपताना दिसत नाही, पुराच्या वेढात सापडलेलं शेत पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात आसवं आली. पाऊस आणि पुरानं सोयाबीन कापूस, आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सरकाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.