`मी एवढेच सांगेन की...`; CM च्या मुलाने आपली सुपारी दिल्याच्या राऊतांच्या दाव्यावरुन अमृता फडणवीसांचा टोला
amruta fadnavis criticise sanjay raut: खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलावर केलेल्या गंभीर आरोपांवरुन अमृता फडणवीस यांचा खोचक टोला
Amruta Fadnavis Slams Sanjay Raut: उद्धव ठाकरेंचे समर्थक खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या जिवाला धोका असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाण्यातील कुख्यात गुंडाला आपली सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी केलेल्या या दाव्यावर राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सविस्तर प्रतिक्रिया नोंदवताना राऊत यांनी पुरावा नसताना असा आरोप करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही सुरक्षेसंदर्भातील चिंता व्यक्त करणाऱ्या राऊत यांना मोजक्या शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
राऊतांचा दावा काय?
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवलं आहे. "गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे व हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली. माझी त्याबद्दल तक्रार नाही. असे राजकीय निर्णय होत असतात. लोकप्रतिनिधींची सुरक्षा हा सरकारचा विषय आहे व गृहमंत्री म्हणून आपण त्याबाबत सक्षम आहात, तरीही एक गंभीर बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे," असं राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे.
फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या पत्रासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली. या पत्रासंदर्भात प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी, "पहिल्यांदा तर हे पत्र सुरक्षा मागण्यासाठी आहे की सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे हा माझा प्रश्न आहे. सुरक्षेचे विषय हे राजकारणाशी जोडणं चूकीचं आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय अशाप्रकारचा आरोप करणं चूक आहे. संजय राऊत असतील किंवा इतर कोणालाही असुरक्षित वाटत असेल तर ती असुरक्षितता निश्चित आहे का? त्यांना सुरक्षा देण्याची गरज आहे का यासंदर्भातील कारवाई इंटलिजन्स डिपार्टमेंट करतं. कोणालाही सुरक्षा द्यायचं काम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक वेगळी समिती आहे. ती मुख्य सचिवांच्या अंतर्गत काम करते," असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच पुढे बोलताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी, "या इंटलिजन्स डिपार्टमेंटमध्ये होम सेक्रेट्री, डीजी, मुंबई सीपी आहेत. त्यांचं पत्र त्या कमिटीकडे जाईल. त्याचं असेसमेंट घेईल. सुरक्षा आवश्यक असेल तर ती पुरवली जाईल," असं फडणवीस यांनी सांगितलं.
रोज खोटं बोलल्याने...
फडणवीस यांनी संजय राऊत यांना टोला लगावताना सारखं खोटं बोलून सहानुभूती मिळत नाही असं म्हटलं आहे. "त्यांना (संजय राऊत यांना) जी प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामध्ये ते विनाकारण कुठला तरी आरोप करतात. कधी 2000 कोटींचा आरोप करतात तर दुसरा. एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. पूर्वी त्यांच्या आरोपाला आम्ही उत्तर तरी द्यायचो. इतके बिनडोक आरोप ते करतात की काय उत्तर द्यायचं असा आम्ही विचार करतो. त्यांना वाटतं की सहानुभूती मिळेल. रोज खोटं बोलल्याने सहानुभूती मिळत नाही. अशाप्रकारेच चुकीचे आरोप लावल्याबद्दल त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी होऊ शकते. गंभीर विषय गंभीरच ठेवायला हवा," असं फडणवीस म्हणाले.
अमृता फडणवीस यांचाही टोला
एका कार्यक्रमानंतर नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता यांना राऊत यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी बाजूलाच उभ्या असलेल्या एका डॉक्टरांकडे पाहत खोचकपणे प्रतिक्रिया नोंदवली. "मी एवढेच सांगेन की अर्जूनजी तुम्ही अजूनही औषधं बनवा ज्यामुळे लोक शांत राहतील. आपल्या महाराष्ट्रात शांतता राहील. शांतता राहिल्यास विकास नक्कीच होईल," असं अमृता म्हणाल्या. म्हणजेच संजय राऊत यांना एखादं औषध देण्याची गरज आहे असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.