Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतरही आरोपीचा माज उतरला नव्हता. त्याने माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी हा सराईत गुन्हेहार असून विशाल गवळी असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर याआधीही बलात्कार आणि छेडछाडीसारखे गुन्हे दाखल झाले आहेत. पीडित मुलगी शिकवणीवरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. इतकंच नाही तर खाली जमिनीवर पाडून बलात्काराचा प्रयत्नही केली. पण मुलीने आपली सुटका करुन घेत घर गाठलं आणि आई-वडिलांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. 


मुलीने हिंमत धावत करुन घेतली सुटका


बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगी घरी परतत असतानाच विशाल गवळीने स्कुटीवरुन तिचा पाठलाग सुरु केला. संधी मिळताच त्याने तिला खेचत रस्त्याच्या शेजारी नेत तिथे बलात्काराचा प्रयत्न केला होता. पण मुलीने सुटका करुन घेतली आणि तेथून पळ काढला होता. मुलीने आई-वडिलांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला. यानंतर पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, सराईत गुन्हेगार असणाऱ्या या आरोपीला आपल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप वाटत नव्हता. याचं कारण पोलिसांनी अटक केल्यानंतर माध्यमांसमोर नेलं असता आरोपी विशाल गवळीने जणू काही आपण फार मोठं शौर्य गाजवलं आहे अशा थाटात दोन्ही बोटं उंचावून विजयाची खून दाखवली. 


आरोपी विशाल गवळी याच्याविरोधात याआधी देखील बलात्कार आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्याला याआधी तडीपारही करण्यात आलं होतं. दरम्यान, त्याचा हा फोटो व्हायरल होत असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. 


रुपाली चाकणकरांचं ट्वीट


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनीही या घटनेची दखल घेतली असून आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केलं असून, त्यात ठाणे पोलीस आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. 


ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "कल्याणमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न एका सराईत गुन्हेगाराने केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने स्वतःची सोडवणूक करून घेतल्याने ती बचावली. या प्रकरणातील अटक आरोपीवर याआधीचे बलात्कार आणि पोक्सो असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याच समोर आले आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि तडीपार असलेला आरोपी मोकाट आहे यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. राज्याचे गृहमंत्री आपण दखल घेऊन आरोपी व संबंधित यंत्रणेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आयोगाच्या वतीने करीत आहोत".