बाण थेट विद्यार्थ्याच्या गालात घुसला; धनुर्विद्या ट्रेनिंग सेंटरमधील धक्कादायक प्रकार
प्रशिक्षण सुरू असताना एका 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या गालात बाण घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : प्रशिक्षण घेत असताना थेट विद्यार्थ्याच्या गालात बाण घुसला आहे. अमरावतीमधील(Amravati,Daryapur) धनुर्विद्या ट्रेनिंग(archery training) सेंटरमधे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. यामुळे क्रिडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जाते की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अमरावतीत जिल्ह्यातल्या दर्यापूरमध्ये हे ट्रेनिंग सेंटर आहे. हा जखमी विद्यार्थी धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षण सुरू असताना एका 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या गालात बाण घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेंदांत गणेशराव डहाले असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. शासकीय क्रीडा परिसरात त्याचे धनुर्विद्येचे प्रशिक्षण सुरू होते. यावेळी सरावा दरम्यान बाण थेट त्याच्या चेहऱ्यात घुसला.
या दुर्घटनेत वेदांत गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दर्यापुरामधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या टीमने अत्यंत सावधानीपूर्वक गालात घुसलेला बाण काढला. या घटनेत वेदांतचा डोळा थोडक्यात बचावला आहे. सध्या वेदांतची प्रकृती स्थिर आहे.
ट्रेनिंग सुरु असताना हा अपघात झाला. क्रीडा अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच या दुर्घटनेला जबाबदरा कोण याची चौकशी करण्याची मागणी देखील केली जात आहे.