रायगड : अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामी हे सध्या तुरुंगात आहेत. या मुद्यावर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाचे काही नेते अर्णब गोस्वामी यांच्या मागे उभे ठाकले आहेत. अशा वेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक यांनी मराठी माणसांना भावनिक आवाहन केलं आहे. हे भावनिक आवाहन करताना अक्षता नाईक म्हणाल्या, सत्य आपोआप बाहेर पडतं, सत्याचा विजय होतो. सत्यासाठी उभे राहा, मराठी माणसांनी पाठीमागे उभे राहावे, असं आवाहन अक्षता नाईक यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा नाईक या सत्र न्यायालयाच्या आवारात उभ्या असताना त्यांनी सत्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन केलं. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले आणि याच तणावात अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली, असा आरोप अर्णब गोस्वामी यांच्यावर आहे. अन्वय नाईक यांच्या सूसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांचं नाव होतं. ही आत्महत्या २०१८ साली झाली होती.


या प्रकरणात आता अर्णब गोस्वामी यांना अटक झाली आहे. अर्णब यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे आपल्याला कोठडीत मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. तर अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


अर्णब गोस्वामी यांना सध्या तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. अर्णब यांना आपण तळोजा जेलमध्ये भेटण्यास जाणार आहोत, कुणाला काय करायचं ते करून दाखवा असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला आहे. तर अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला, तर या देशाची जनता सहन करणार नाही, असं देखील राम कदम यांनी म्हटलं आहे.