काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी, आनंद परांजपेंना फटका बसण्याची शक्यता
काँग्रेसमधील गटबाजीचा राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता
ठाणे : नवी मुंबई काँग्रेसमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे. याचाच परिणाम आघाडीच्या प्रचारावर होत असून त्याचा फटका आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक आणि माजी जिल्हाध्यक्ष दशरत भगत यांच्यात जुंपली आहे.
राष्ट्रवादीने प्रचाराला अनिल कौशिक यांना बोलावल्यावर दशरथ भगत यांचा नगरसेवक गट प्रचारापासून चार हात लांब राहतो आहे. भगत यांना निमंत्रण दिल्यानंतर कौशिक नाराज होतात. कौशिक यांनी भर सभेत राष्ट्रवादीकडे नवी मुंबईचे महापौरपद देण्याची मागणी केली. यावर भगत यांनी आक्षेप घेतला. काँग्रेसची ताकद आमदारकी लढवण्याची असताना सध्याचे जिल्हाध्यक्ष पालिकेच्या पदांची भीक मागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाण्यात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात थेट लढत असणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. २००९ मध्ये मात्र शिवसेनेला येथे फटका बसला होता. पण २०१९ मध्ये येथे नाईक कुटुंबातून उमेदवार असेल अशी शक्यता होती. पण तसं झालं नाही. राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. आनंद परांजपे हे ठाण्यात राहत असले तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवा आहे. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने २ लाख ८५ हजार मतांनी विजय मिळवला होता.