आनंदवारी : गजानन महाराजांची पालखी डिग्रस कऱ्हाळे गावात दाखल
गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने हे गाव गेल्या ५१ वर्षापूर्वी एकत्रित आल ते आजतयागत.
गजानन देशमुख- झी मीडिया हिंगोली: विठूरायाच्या भेटीसाठी आसुसलेला वारकरी आषाढी एकादशी निमित्ताने आपल्या सावळ्या विठूरायाच्या भेटीला तहान-भूक विसरून पंढरीच्या दिशेने निघालेत. राज्यभरातून दिंड्या पालख्या पंढरपूरला निघाल्यात. शेगावचे संत शिरोमणी गजानन महाराज यांची पालखीही विदर्भातून मराठवाड्यात दाखल झाली आहे. या पालखी आणि वारकऱ्य़ांसाठी हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे गावात आगळ्या-वेगळ्या पद्धतीचा पाहुणचार स्वागताला असतो. गेल्या ५१ वर्षापासून इंथ पालखीचं स्वागत केलं जातं. संपूर्ण गावाचा दिंडीच्या स्वागतामध्ये सहभाग असतो. महारुद्र मंदिरात होणाऱ्या आरतीसाठी आणि पालखीच्या दर्शनासाठी लाखो भक्त जिल्हा भरातून या गावात दाखल होत असतात.
५१ वर्षांपासूनची परंपरा
डिग्रस कऱ्हाळे येथील ग्रामस्थ पालखीच जंगी स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीन करीत असतात. गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने हे गाव गेल्या ५१ वर्षापूर्वी एकत्रित आल ते आजतयागत. या गावात एकोपा, प्रेम, जिव्हाळा नांदतोय. या पालखीचा रात्रीचा मुक्काम डिग्रस कऱ्हाळे या गावी ठेवण्यात आला. वारकऱ्यांच स्वागत घरच्या जेवणाने व्हावं अशी इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली. पालखीतील वारकऱ्यांची संख्या भरपूर असल्या कारणाने कोण्या एका ग्रामस्थाला पालखीला अन्नदान करन किंवा स्वयंपाक करण परवडणार नव्हत. प्रत्येकाच्या घरून भाज्या आणि पोळ्या मागवण्याच ठरलं. त्यामुळ या उत्साहात सारा गाव एकोप्यान सहभागी झाला आणि १० हजार वारकऱ्यांच्या अन्नदानाचा प्रश्न गावकऱ्यांनी सहजच सोडवला. तेव्हा पासून तर आजतागायत पर्यंत चपात्या गोळा करून पाहुणचार देण्याची परंपरा सुरूच आहे. बदलत्या काळ मानाप्रमाणे यापरंपरेत आज गोड धोड जेवणाची भर पडली.
दिंडीचं जंगी स्वागत
गावात पालखी येणार म्हटल की सकाळपासूनच गावातील महिला सडा सारवण करून दारात रांगोळी काढतात. दिंडी सुरु झाली तेव्हा पासून तर आज पर्यंत या गावात दिंडी कधी येणार याचीच वर्षभर ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागलेली असते. सर्व ग्रामस्थ एकत्र येउन एकोप्याने या दिंडीचं जंगी स्वागत करीत असतात. माउलीच्या भेटीसाठी आतुरलेल्या वारकऱ्य़ांच्या सेवेत कुठलीही कमतरता राहू नये यासाठी गावातील लहान थोरापासून सगळेजण झटत असतात. साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या उक्ती प्रमाणे सर्व गाव या उत्साहात सहभागी होत असते.