अमरावती : पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत असतो. पण आज राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या ताफ्यातील निवृत्त होत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कडक सॅल्यूट ठोकून अनोख्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारुतीराव कीन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव किन्हाके आज सेवानिवृत्त झाले. 


कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी किन्हाके यांना निरोप देताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांचं औक्षण करून तसंच त्यांना शाल, श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत मंत्री यशोमती ठाकूर यांनी किन्हाके यांना सॅल्यूट केला तसंच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.


निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा अशा पद्धतीने सन्मान करण्यात आल्याने सर्वच स्तरातून मंत्री यशोमती ठाकूर यांचं कौतुक होत आहे.