आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा संताप; विरोधकांनीही सरकारला धरले धारेवर
परीक्षेचा काही तासांआधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : राज्य सरकारकडून घेण्यात येणारी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचा काही तासांआधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राज्यभरातील विद्यार्थी आपआपल्या परीक्षा केंद्रांवर म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी वेगैरे पोहचण्याच्या तयारीत असताना आरोग्य विभागाने अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकजण केंद्राच्या परिसरात पोहचलीसुद्धा होती.
विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी (24 सप्टेंबर) सकाळी 10.18 वाजता ट्वीट करून म्हटलं होतं की, आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षांर्थीनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.
हे ट्वीट केल्यानंतर रात्री 10 च्या सुमारास अचानक विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मॅसेज फोनवर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे य़ांनी ट्वीट करून माहिती दिली की, आरोग्य विभागाच्या वर्ग क आणि वर्ग ड वर्गातील विविध पदांसाठी दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आरोग्य विभागाच्या निर्णयावर आणि विद्यार्थ्यांना झालेल्या मनस्तापामुळे विरोधकांनी सरकारला कठोर टीका केली आहे.
शिवाय विद्यार्थ्यांचा परीक्षेसाठी जाण्या येण्याचा वेळ आणि पैसा खर्च झाला आहे. त्याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.