`या` मंत्र्यांकडे वनखात्याच्या मंत्रिपदाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता
वनखात्याचा तात्पुरता पदभार शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याकडे दिला जाऊ शकतो अशी सध्या चर्चा आहे.
मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण संजय राठोड यांना भोवणार असल्याचं दिसत आहे. अखेर संजय राऊत यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर 20 दिवसांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. भाजपनं बदनामी करून, घाणेरडं राजकारण केल्याचा आरोप यावेळी संजय राठोड यांनी केला आहे.
संजय राठोड यांनी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वनखात्याचा तात्पुरता पदभार शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्याकडे दिला जाऊ शकतो अशी सध्या चर्चा आहे. या जेष्ठ नेत्यांपैकी एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांच्याकडे वनखात्याचा पदभार तात्पुरत्या स्वरुपात दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवलाय. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राठोड यांना भोवलंय आणि राजीनामा द्यावा लागला.
राजीनामा देतो पण चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा स्वीकारु नका, अशी विनंती राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं समजतंय. पूजा चव्हाणनं आत्महत्या केल्यानंतर २० दिवसांनी राठोडांनी राजीनामा दिला. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. त्याआधी विरोधक संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आक्रमक झाले होते.
राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता. अखेर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
दुसरीकडे राठोड यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनं आपली आक्रमक भूमिका सोडलेली नाही. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचा इशारा देखील फडणवीस यांनी दिला आहे.