मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीला होणार आर्थिक नुकसान व भविष्यात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात  परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.  अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली . आज २६जून रोजी एसटी महामंडळाच्या  मुख्यालयात बैठक  बोलाविण्यात आली. या बैठकीला कोल्हापूरहून व्हिडिओ  कॉलद्वारे  परिवहन  राज्य मंत्री श्री सतेज पाटील यांच्यासह  एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने  व एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल परब म्हणाले कि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला  होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याची  सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली . त्यानुषंगाने भविष्यात खर्चामध्ये बचत करणे व प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात आला. 


एल.एन .जी . इंधावरील बसेसना प्राधान्य  - सध्या एसटी महामंडळामध्ये १८५०० बसेस आहेत. यासर्व बसेस डीझेल इंधनावर चालतात. एसटीच्या एकूण महसुलाच्या ३४ टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होत आहे. भविष्यात  या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सध्या तांत्रिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बसेस डिझेल इंधनावरून एल.एन .जी  इंधनावर रूपांतरित करण्यात येणार आहेत.  पाहिल्या टप्प्यात १२०० बसेस एल.एन .जी  इंधनावर रूपांतरित करण्यात येतील.  


एसटीची मालवाहतूक  - महिन्याभरापूर्वी एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून एका महिन्यात एसटीने १ हजार ९०७ फेऱ्या द्वारे सुमारे ७२ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. डिसेंबर २०२१ अखेर सुमारे २००० मालवाहू वाहने तयार करून त्याद्वारे सुमारे २५० कोटी रुपये  महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शासनाच्या विविध विभागांना संपर्क साधून शासकीय मालवाहतूक एसटीकडे  वळविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 


खाजगी बसेस बांधणीला सुरुवात करणार - एसटीकडे सध्या ३ मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या कार्यशाळेमध्ये एसटी बसेसची पुनर्बांधणी करण्यात येते. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खाजगी बसेस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली  असून खाजगी वाहन धारकांना बस बांधणीसाठी एसटी कडे आकर्षित करण्याचे प्रयन्त केला जाणार  आहेत.


व्यासायिक तत्वावर टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्प सुरु करणार - सध्या एसटी महामंडळाचे राज्यभरात ९ टायर   पुनर्रस्थिरीकरण प्रकल्प कार्यंवित आहेत. प्रकल्पाद्वारे एसटी साठी लागणाऱ्या टायरचे पुनर्रस्थिरीकरण  करण्यात येते. भविष्यात  या प्रकल्पाची  क्षमता लक्षात घेता एसटीची गरज  भागवून व्यावसायिक तत्वावर टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. 



याबरोबरच मंत्री, ॲड.  अनिल परब यांनी  एसटी महामंडळाच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने व्यवहारिक योजना तयार करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले आहेत. याबरोबरच भविष्यात वाहतुकीक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून फायद्याच्या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या वाढवून अनुउत्पादित  किलोमीटर वाहतुकीतून कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मंत्री, ॲड.  अनिल परब यांनी सांगितले.