प्राण्यांच्या टाकाऊ अवशेषांची नदीत विल्हेवाट, नागरिक संतप्त
पाण्यात चक्क कातडी आणि टाकाऊ अवशेष टाकले जात असल्याचे उघड
नागपूर: चंद्रपूरमध्ये नदी प्रदूषणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे नागरिक हादरलेत. इरई नदीच्या पात्रात बोकडांची शेकडो कातडी भिरकावली जात असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळते. बोकड कापणाऱ्या काही मंडळींनी बोकड मांस विकून उरलेली कातडी आणि कचरा थेट नदीत फेकला.
या भागातून शेतात जाणाऱ्या नागरिकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी ही दृश्ये कॅमेऱ्यात चित्रीत केली. चंद्रपूर पालिकेने मांस आणि टाकाऊ पदार्थांचे अवशेष पुरण्यासाठी या व्यावसायिकांना शहरात दोन जागी विशेष व्यवस्था करून दिली आहे.
मात्र, ज्या नदीच्या पाण्यातून पाणीपुरवठा होतो, नागरिक-जनावरे रोज वापरासाठी ज्या पाण्याचा उपयोग करतात अशा पाण्यात चक्क कातडी आणि टाकाऊ अवशेष टाकले जात असल्याने नागरिक संतापले आहेत. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मनपाने आता या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.