अहमदनगर : लोकपाल, कृषी समस्या या विषयांवर २ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याबाबत आपण ठाम असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी व्यक्त केलाय. 


दरम्यान अण्णांनी उपोषण करू नये यासाठी राज्य सरकारनं अण्णांसोबत चर्चा सुरू केलीय. याकरता अण्णा हजारे यांच्यासोबत प्राथमिक चर्चेची जबाबदारी सरकारनं गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे. त्याचाच भाग म्हणून गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. अण्णांनी आंदोलन करू नये, अशी विनंती महाजनांनी यावेळी केली. मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर अण्णा हजारे ठाम आहेत.