अहमदनगर : राळेगणसिद्धी येथे सुरु असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आंदोनल मागे घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पाच तास बंद खोलीत चर्चा झाली. त्यानंतर अण्णा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यामुळे सातव्या दिवशी अण्णांच्या उपोषणावर तोडगा निघण्याची चिन्हे होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णा यांनी आपले उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, अण्णांच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत. यावर योग्य तो तोडगा काढण्यात येणार आहे. एक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीत अण्णा हजारे असतील, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. पुढील अधिवेशनात अण्णांच्या मागण्याचा विचार करुन त्यांना मंजुरी दिली जाईल, असे ते म्हणालेत.


अण्णा हजारेंच्या सगळ्या मागण्या मान्य : मुख्यमंत्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. लोकपालच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकायुक्त नेमण्यासंदर्भातल्या कायद्याची नव्याने पुनर्रचना या दोन प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच अन्य मागण्यांवरही सरकारने सहमती दर्शवली आहे. ज्यामुळे मी समाधानी आहे आणि उपोषण मागे घेतो आहे, अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली. अण्णा हजारे आज उपोषण सोडणार का, याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागले होते. अखेर अण्णा हजारे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.


अण्णा हजारे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राळेगणसिद्धीमध्ये बंद खोलीत गेल्या पाच तासांपासून चर्चा सुरू होती. अण्णा आणि मुख्यमंत्र्यांसह या चर्चेसाठी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंहही या बैठकीला उपस्थित होते. पण एका कार्यक्रमानिमित्त ते अण्णांशी चर्चा करुन लवकर निघून गेले. राळेगणसिद्धीमध्ये उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.


राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांचे पत्र घेऊन महाजन, तर पंतप्रधान मोदी यांचे पत्र घेऊन भामरे हे अण्णांना भेटले. बंद खोलीत तिघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आणि अण्णा हजारे यांनी उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले. यानंतर अण्णा हजारे ग्रामसभेसाठी रवाना झाले. त्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता. आज स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले आणि त्यांनी पाच तास चर्चा गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य असल्याचे सांगत अण्णांनी आपल्या उपोषणावर विचार करावा, असे स्पष्ट केले. त्यानंतर अण्णांना आपण संतुष्ट असल्याचे सांगत आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.


दरम्यान, कृषीमूल्य आयोग स्थापन करणे, लोकायुक्त स्थापन करण्यासाठी समिती स्थापन करणे, अशा अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. तर दुसरीकडे अल्प भूधारक शेतकऱ्यांना सहा हजार वार्षिक निधी जाहीर करण्यात आला आहे. या निधीत वाढ करावी, अशीही मागणी अण्णा हजारे यांनी केली होती. या मागणीबाबतही आम्ही विचार करत आहोत. शेतकऱ्यांच्या निधीत वाढ करण्याचा आमचा विचार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.