मुंबई : अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड आणि सिल्लोड येथे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे, त्यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. आज पाचोड येथे जिल्हा बँकेतील ९६, एसबीआयचे ४६, ग्रामीण बँकेचा १, बँक ऑफ महाराष्ट्रचे ९८, बँक ऑफ बडोदाचा १ कर्जदार आज कर्जमुक्त झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाचोड येथील एकूण २४२ शेतकरी आज कर्जमुक्त झाले. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना आज आपल्या डोक्यावरचं ओझं कमी झालं असं वाटतं आहे. इतरांचीही नाव लवकर यावी जाहीर करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.



शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या दृष्टीनं सरकारनं पहिला पाऊल टाकलं आहे. शेतकऱ्यांना सन्मानानं कर्जमाफी दिली जाईल, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. महाविकास आघाडीत मतमतांतरे आहेत, पण मतभेद नाहीत. चर्चेतून काही मुद्यांवर मार्ग निघेल, असंही ते म्हणाले.


महाविकास आघाडी सरकारनं २ लाख रुपयांच्या कर्जमाफीची अमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील २ गावातील शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्त्वावर कर्जमाफी दिली गेली. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी आणि जखणगाव या दोन गावातील ९७२ शेतकऱ्यांचं २ लाखांचं कर्ज माफ झालं आहे. या दोन गावातील शेतकऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कर्जमाफीमुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे.