रायगड : अलिबाग न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीला रायगड पोलीस आव्हान देणार आहेत. रायगड पोलीस सत्र न्यायालयात पूनर्निरीक्षण अर्ज दाखल करणार आहेत. अर्णब यांना अटक केल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्यन्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडी नाकारली असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी रायगड पोलीस न्याय दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटीरियर डिझायनर आत्महत्येप्रकरणी अटकेला आव्हान देणारी याचिका अर्णब गोस्वामी यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती द्यावी. तसंच अलिबाग आणि महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर रद्द करावी आणि तातडीनं सुटका करावी अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्यात. 



न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज दुपारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अलिबाग न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सध्या त्यांना एका स्थानिक शाळेत ठेवण्यात आलंय. 


दरम्यान, अर्णब गोस्वामी प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अर्णब गोस्वामी भाजपचा कार्यकर्ता असून कालचे आंदोलन त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याची टीका राऊत यांनी केली. भाजपने नाईक कुटुंबाच्या व्यथा जाणून घेतल्या असल्या तर आंदोलन केले नसते, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच रिया आणि नाईक कुटुंबाच्या बाबतीत भाजपची भूमिका वेगळी असल्याचाही आरोप राऊत यांनी केला.