वयाच्या 75 व्या वर्षी चित्रकलेची परीक्षा, आतापर्यंत रेखाटली 5 हजार चित्र
आजोबांना चित्रकला पुन्हा खुणावु लागली.
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : शिकण्याकरीता वयाचा अडसर नसतो हे नेहमीच म्हटलं जात, त्यात जिद्द असली कर काहीही साध्य आहे, याची प्रचिती औरंगाबादेत आली आहे. 75 वर्षाच्या डॉ अरूण चौधरी यांच्या माध्यमातून ही प्रचिती आली आहे.
वयाच्या 75 व्या वर्षी आजोबा नक्की कसली परीक्षा देत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला होता. आजोबा परीक्षा देत आहेत, आणि तीही चित्रकलेची. धकाधकीच्या आयुष्यात जे जमलं नाही ते काम आता निवृत्तीनंतर आजोबांनी करण्याचं ठरवलं आहे. लहानपणापासूनच आजोबांना चित्रकलेची आवड होती, मात्र जन्मापासून असलेला रंगआंधळेपणामुळं ते चित्रांपासून दूर राहिले. पुढे शिक्षण आणि संसाराच्या व्यापात ही आवड मागे पडली. त्यांची नात मात्र छान चित्र काढायला लागली, आणि आजोबांना चित्रकला पुन्हा खुणावु लागली.
आपला छंद पुर्ण करायचा चंग बांधला, रंगआंधळेपणाची अडचण होतीच, त्यावर नातीनं आयडीयाची कल्पना लढवली, तीनं रंगवायच्या पेन्सिलवर रंगाची नाव लिहली, ती कुठं वापरायची तेही लिहलं. त्यामुळं रंगआंधळेपणाचा पेच सुटला, आजोबा चित्रकलेच्या क्लासला जावू लागले, आणि बघता बघता पारंगत होत 5 हजारांवर चित्र सुद्धा काढली.
या आजोबांनी मुक्त जगायचं ठरवलं आणि ते तसे जगलेही. आणखी जगलोच तर अगदी क़ॉलेजात जावून चित्रकलेचं शिक्षण घेईल असं ते सांगत आहेत.
पशूवैद्यकीय डॉक्टर म्हणून चौधरी आजोबा निवृत्त झाले, इच्छा आणि जिद्द असली तर कुठल्याही वयात काहीही करता येतं हेच चौधरी आजोबांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं.