नागपूर : महागाईच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा झाली. त्यावरून गोंधळ होऊन दोन्ही सभागृहे बंद पडली. पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूक झाल्या आणि लगेच महागाई वाढली. निवडणुकापुरती आश्वासने द्यायची आणि नंतर ती विसरायची ही भाजपची एक चाल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या त्या चालीला लोक फसतात. पण, देशात पुन्हा एकदा माहोल तयार होईल. देशात खरी समस्या हिजाब नाही. खरी समस्या काश्मीर फाईल नाही. तर खरी समस्या महागाई आहे, बेरोजगारी आहे. मात्र, भाजप पक्ष नेहमी खऱ्या मुद्द्याला बगल देत आलाय, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली. त्यांनतर त्यांनी अनेकदा मंत्री, आमदार यांना स्न्हेहभोजन दिले. विरोधी पक्षांनाही अधिवेशनापूर्वी चहापाण्यासाठी बोलवण्यात येते. पण, त्यांना सरकारचा चहा गोड लागत नाही, असा टोला त्यांनी लगावला.


ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही तेथील सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने सुडाची कारवाई करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने सूडाच्या, बदला घेण्याच्या भावनेने कारवाई करतात. त्यापद्धतीने महाराष्ट्राचे गृहमंत्रालय अशी सुडाची कारवाई कधीच करणार नाही.


महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला एक प्रतिष्ठा आहे. नेते, नेतृत्व याची एक परंपरा आहे. मात्र, विरोधी पक्ष जर महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयावर जर आरोप करत असतील तर सुडाचे, बदलाचे राजकारण कसे करावे याचे आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून तसे प्रशिक्षण घ्यावे लागेल. पण, त्याची आम्हाला गरज भासणार नाही. कारण, आम्ही तसे बदलाचे राजकारण करणारे नाही, असे संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.


मुख्यमंत्री गृहविभागावर नाराज असल्याची केवळ चर्चा आहे. कोणतीही तपास यंत्रणा आपला तपास करायला स्वतंत्र आहेत. पण, केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई पाहता उद्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तर त्यावरही ईडीची कारवाई होईल अशी भीती वाटत असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला.