रस्ता नसल्याने आदिवासी गरोदर महिलेचा झोळीतून प्रवास
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासींचे हाल
सोनू भिडे, नाशिक-
राज्यात नुकताच जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण आणि आदिवासी भागात कुठलीही लक्षणीय प्रगती झालेली आजपर्यंत दिसून येत नाही. आजही आदिवासी नागरिकांना मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. महिलांची उन्हाळ्यात पाण्यासाठी मैलोमैल पायपीट तर कधी आरोग्यासाठी झोळीतून प्रवास करावा लागता आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हत्तीपाडा येथील एका गरोदर महिलेला घोंगळीची झोळी करून रुग्णालयात नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अगोदर आदिवासी भागात रस्त्यात महिलेची प्रसूती होऊन जवजात बालकांना उपचार मिळाला नसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
नेमक काय आहे प्रकरण
त्र्यंबकेश्वरपासून (Trimbakeshwar) अवघ्या २० किलोमीटर अंतरावर हत्तीपाडा हि आदिवासी (Tribal) वस्ती आहे. या पाड्यावरील एक महिला गरोदर (pregnant woman) होती. महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्याने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली मात्र रस्ता खराब असल्याने हि रुग्णवाहिका वस्तीवर येऊ शकली नाही. दोन ते तीन किलोमीटर लांबच थांबली. अखेर महिलेला घोंगळीची झोळी करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले.
प्रशासनाचे आदिवासी भागाकडे दुर्लक्ष
आदिवासी भागात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. यात रस्त्याची दुरावस्था असल्याने महिलेची रस्त्यात प्रसूती, नदीवर पूल नसल्याने पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत, तर कधी शाळेत जाण्यासाठी नदीच्या पाण्यातून प्रवास आदिवासींना करावा लागत आहे. यावेळी आदिवासी भागाकडे प्रशासनाच दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
नागरिकांनी केला व्हिडीओ व्हायरल
हत्तीपाडा वस्ती येथील नागरिकांनी रस्त्याची मागणी करूनही रस्ता तयार करून दिला जात नसल्याने अखेर गावकऱ्यानी महिलेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला असल्याची चर्चा आहे.
कुठल्याही शहराची किंवा गावाची प्रगती करायची असेल तर ते एकमेकांशी जोडणे गरजेच असल्याच म्हटलं जात. आणि यासाठी रस्ते हा मुख्य स्त्रोत आहे. मात्र आदिवासी भागात आजही रस्ते नाहीत. यामुळे आदिवासी भागांचा विकास अद्याप झाला नसल्याच म्हटलं जात आहे.