`पंकजा मुंडेंना MIM ने दिलेली पक्षप्रवेशाची ऑफर, पण...`; असदुद्दीन ओवेसींचा गौप्यस्फोट
Asaduddin Owaisi About Pankaja Munde: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमचे अध्यक्ष असलेल्या असदुद्दीन ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला गौप्यस्फोट
Asaduddin Owaisi About Pankaja Munde: भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमने (AIMIM) पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदरादबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी पंकजा यांना 2 वर्षांपूर्वीच पक्षप्रेवेशासंदर्भात विचारलं होतं असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंच्या नाराजीची चर्चा
पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीवर नाराज असल्याची चर्चा मागील बऱ्याच काळापासून सुरु आहे. अनेकदा पंकजा यांच्यासंदर्भातील बातम्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यानंतर आता दक्षिण महाराष्ट्रामध्ये हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समितीनेही पंकजा यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असं असतानाच पंकजा यांच्याबद्दल असदुद्दीन ओवेसी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी 2 वर्षांपूर्वीच पंकजा यांना आम्ही पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती असा दावा केला आहे.
पंकजांबद्दल मोठा गौप्यस्फोट
"पंकजा मुंडेना 2 वर्षांपूर्वीच इम्तियाज जलील यांनी ऑफर दिली होती. पण त्या समजूनच घेत नाहीत," असं विधान असदुद्दीन ओवेसी यांनी पंकजा यांच्याबद्दल विचारलं असता केलं. तसेच पुढे बोलताना असदुद्दीन ओवेसी यांनी पक्षी वातावरण पाहून पावसाचा अंदाज लावतात असा संदर्भ देत, "2 वर्षांपूर्वीच इम्तियाज यांनी अंदाज हेरुनच पंकजा यांना विचारलं होतं. आपला पक्ष वाढवण्याचा हक्क प्रत्येक पक्षाला आहे. हा त्यांना लोकशाहीने दिलेला हक्क आहे," असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.
MIM आणि BRS एकत्र येणार?
असदुद्दीन ओवेसी यांना दक्षिणेमधील पक्ष असलेल्या बीआरएससंदर्भातही विचारण्यात आलं. त्याच वेळी त्यांनी पंकजा यांना बीआरएसआधी आम्ही पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, असा दावा केला. तसेच असदुद्दीन ओवेसी यांना दक्षिणेतील पक्ष म्हणून बीआरएस आणि एमआयएम भविष्यात एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना असदुद्दीन ओवेसी यांनी, "एमआयएमचे आणि बीआरएस एकत्र येण्यासंदर्भात काहीही चर्चा झालेली नाही," असं उत्तर दिलं. तसेच एमआयएमचे काही नगरसेवक आणि दोन आमदार महाराष्ट्रामध्ये असल्याचा उल्लेखही असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी आवर्जून केल्याचं पहायला मिळालं.