आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची मुख्यमंत्र्यांहस्ते शासकीय महापूजा
बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव...अशी आर्त प्रार्थना केलीय यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरलेलं वीणेकरी केवळ आणि इंदुबारी कोलते दाम्पत्यानं.
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. तुडुंब भरलेलं, आनंदी पंढरपूर पुन्हा पाहायचंय... ते वातावरण लवकर निर्माण होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठुराया चरणी केली आहे.
तब्बल दोन तास सुरू असलेल्या या सोहळ्याला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते. गेली 20 वर्षे विणेकरी म्हणून सेवा देणारे केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई यंदा मानाचे वारकरी म्हणून या महापूजेत सहभागी झाले होते. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बा विठ्ठला, कोरोनाला पळवून लाव... अशी आर्त प्रार्थना केलीय यंदाच्या वर्षी मानाचे वारकरी ठरलेलं वीणेकरी केवळ आणि इंदुबारी कोलते दाम्पत्यानं... आज आषाढी एकादशी.. पण वारकऱ्यांवीना पंढरपूर नगरी सुनी सुनी वाटत आहे. खर तर प्रत्येक वर्षी हा परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलेला असतो. पण याही वर्षी कोरोनचा प्रादुर्भाव असल्याने मंदिर परिसर सुन्न वाटतंय.
प्रशासनासोबतच्या चर्चेनंतर संतांच्या पालख्या विसबावी पासून पंढरपूर पर्यंत पायी निघाल्या आहेत. मानाच्या पालख्यानी एका पाठोपाठ पंढरपुरात प्रवेश केलाय. टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरात पालख्या आपापल्या मठांत पोचत आहेत.
गेल्यावर्षा पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या लवकरच दाखल होतील. दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.