आषाढीच्या वारीसाठी आळंदी व देहू संस्थानांचा सरकारला `हा` प्रस्ताव
आता राज्य सरकार ३० मे रोजी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे: शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढीची वारी निर्विघ्न पार पडावी, यासाठी आता आळंदी आणि देहू संस्थानाने राज्य सरकारसमोर नवा प्रस्ताव मांडला आहे. आम्ही मोजक्याच वारकऱ्यांना घेऊन पालखी पंढरपूरला नेऊ. दिंड्या-पताका मिरवणार नाही किंवा वाखरी ते पंढरपूर असा एकच दिवसाचा पायी प्रवास करण्याची तयारी आळंदी व देहू संस्थानाकडून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार ३० मे रोजी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वारकरी प्रतिनिधींची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीअंती देवेंद्र फडणवीस यांनी असंख्य वर्षांची परंपरा असलेली पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होणार नाही, अशा विश्वास व्यक्त केला. आम्ही सरकारकडे यासाठी पाठपुरावा करु. या संकटकाळात समाजाला सोबत घेत आणि समाजाला जागे करण्याचे काम वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात करत आहे. आपली वारकरी परंपरा किती मोठी आहे, याचेच प्रत्यंतर यातून येते. कोरोनाचे संकट असले तरी वारीची परंपरा खंडित होणार नाही. वारकरी प्रतिनिधींनी तीन प्रस्ताव सरकारला दिले आहेत आणि या कठीण काळात सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा वारीचे स्वरूप कसे असावे, हे ठरवण्यासाठी देहू आणि आळंदी संस्थानांचे प्रतिनिधी, पालखी सोहळा प्रमुख, मालक, चोपदार, प्रमुख दिंडीकरी, विणेकरी यांच्यात सातत्याने चर्चा सुरु आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन वारकऱ्यांनी अनेक बाबतीत तडजोड करण्याची तयारी दाखविली आहे. नियम व अटींना अधीन राहून पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ३० तारखेला राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.