नांदेड : स्वाभिमान गहाण न टाकता उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंसारखा कणखरपणा दाखवावा असं आव्हान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याची भूमिका शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी शिवसेनेला पाठिंबा देणार नसल्याचेही अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं आहे. जी भूमिका पवार साहेबांनी घेतली आहे तीच काँग्रेसची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात निवडणूक निकालानंतर शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेनेला हवी ती मंत्रिपदं मिळवून घेता येतील, पण शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं असा सूर आमदारांनी ही उद्धव ठाकरे यांच्यासमोर गवसला. त्यामुळे शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर तयार होते की, भाजप उपमुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेला शांत करते हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच कळेल. 


राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला घेऊन सरकार स्थापन करेल अशी चर्चा सुरु असली तरी राष्ट्रवादीने याआधीच शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी याधीच म्हटलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील आपली भूमिका स्पष्ट करत या शक्यतेवर पूर्णविराम लावला आहे.


दुसरीकडे शिवसेनेचा सध्याचा रागरंग पाहता विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने एकट्याने सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. 2014 प्रमाणेच लवकरच सरकार स्थापना केली जाईल अशी शक्यता आहे. भाजप फ्लोअर टेस्टला जाण्याची तयारीही सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे. शपथविधीसाठी 31 तारखेचा मुहुर्त ठरल्याची माहिती आहे.


दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह 30 ऑक्टोबरला मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात ते मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी ही माहिती दिली आहे.