आम्हाला वाटलं मंदिर बांधूनच परततील, अशोक चव्हाणांचा शिवसेनेवर निशाणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अयोध्यावारी केली होती.
शिर्डी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अयोध्यावारी केली होती. या अयोध्यावारीप्रकरणी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निशाणा साधला. आम्हाला वाटलं आता राममंदिर बांधूनच परततील मात्र गेले आणि लगेच आले. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपाचा चुनावी जुमला सुरू असल्याची टीकाही अशोक चव्हाण यांनी केली. अशोक चव्हाण शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
येत्या फेब्रुवारी महिन्यात घोषणांचा पाऊस पडणार आहे, त्यामुळे लोकं या पावसात वाहून जातील, अशी भीती वाटत असल्याचा उपरोधिक टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. सरकार रोज एक घोषणा करत आहे आणि निवडणूक संपल्यावर हा चुनावी जुमला होता म्हणूनही सांगतील, असं अशोक चव्हाण म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीनं प्रकाश आंबेडकर यांना पाहिजे तेवढ्या जागा दिल्या तर मी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडीन, असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते. ओवेसींच्या या वक्तव्यावरही अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. एमआयएमचा मुद्दा आता बाजुला झाला आहे. काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाच्या युतीला माझा विरोध नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, सीपीएम आणि आरपीआय कवाडे गट यांच्याशी बोलणी झाली असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. कोलकात्यामध्ये ज्याप्रकारे समविचारी पक्ष एकत्र आले तशाच प्रकारची आमची महाराष्ट्रात भूमिका असेल, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
सगळे विरोधक एकत्र आले तरी भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला होता. त्यावरही अशोक चव्हाण यांनी भाष्य केलं. नितीन गडकरी किंवा आम्हाला काय वाटतं, यापेक्षा मतदाराला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. पाच राज्यात भाजपला कुठेही यश मिळालं नाही, म्हणजेच जनतेचा कौल भाजपला राहिला नसल्याचं स्पष्ट झाल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा १४ ते १५ हजार आहे. रोज पाच-सहा शेतकरी आत्महत्या करत आहेत. पण पंतप्रधान मुंबईत येतात आणि सिनेमातल्या लोकांना भेटतात. शेतकऱ्यांना भेटावं, असं पंतप्रधानांना वाटत नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. आज शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. कांद्याला आणि भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकत आहेत. शासनाची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही कर्जमाफी फक्त कागदावरच राहिली आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.