गणेश मोहळे, वाशिम : Mobile theft News :अनोळखी व्यक्तीला जर तुमचा मोबाईल देण्याअगोदर ही बातमी आवश्यक वाचा. कोण कशी चोरी करेल याचा भरवसा नाही. एकाने एक कॉल करण्यासाठी दुसऱ्याकडे मोबाईल मागितला. त्याची गरज लक्षात घेऊन बोलण्यासाठी मोबाइल दिला. मात्र, मोबाईल हातात पडताच त्याने पोबारा केला. त्यामुळे मोबाईल देणाऱ्याला डोक्याला हात लावण्याची वेळ आली. पोलीस गाठूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. तो मोबाईल गमावून बसला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी कुटुंबातील सदस्यांशी बोलायचे आहे. माझ्याकडे मोबाईल नाही, असे सांगत फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. तोंडाला मास्क घातलेल्या व्यक्तीने एका तरुणाकडे मोबाईल मागितला आणि नजर चुकवून तो मोबाईल घेऊन पळून गेल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील लोणी फाटा येथे घडली.


हिंगोली जिल्ह्यातील वेलतुरा येथील रहिवासी करण जायभाये हा कामानिमित्त रिसोड शहरात आला होता. लोणी फाटा येथे तो उभा असताना चेहऱ्यावर मास्क घातलेला एका व्यक्तीने त्याच्याकडे येऊन बोलण्यासाठी मोबाईल मागितला. करणनेही सहजरित्या तो त्याला दिला;  मात्र नंबर डायल करतानाच संबंधित व्यक्तीने मोबाईल घेऊन तेथून पळून गेला. 


त्यानंतर करण जायभाये यांनी रिसोड पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.मात्र जवळ मोबाईल खरेदी केल्याचे बिल आणि इएमआय क्रमांक नसल्याने तक्रार दाखल करुन घेण्यात आली नाही. दरम्यान,नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचा मोबाईल देऊन फसगत करुन घेऊ नये. संशयास्पद स्थितीत आढळणाऱ्या व्यक्तिबाबत पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी,असे आवाहन रिसोड पोलीसानी केले आहे.