ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; प्रकृती चिंताजनक
या महिला पदाधिकारी आपल्या मैत्रिणींसह बाजारात जात असताना अज्ञात व्यक्तीने धार धार शस्त्राने दहा ते पंधरा वार केले. हा हल्ल्यात रंजना गंभीर जखमी झाल्या आहेत.
गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group) महिला पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला(crime) झाल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. या हल्ल्यात महिला पदाधिकारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे वाशिम(Washim district) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
रंजना पौळकर असे हल्ला झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचे नाव आहे. रंजना पौळकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुख आहेत.
भररस्त्यात महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला
वाशिम शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर रंजना यांच्यावर हल्ला झाला आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास भर रस्त्यावररंजना पौळकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे.
पौळकर आपल्या मैत्रिणींसह बाजारात जात असताना अज्ञात व्यक्तीने धार धार शस्त्राने दहा ते पंधरा वार केले. हा हल्ल्यात रंजना गंभीर जखमी झाल्या आहेत.
प्रकृती चिंताजनक
हल्ला करुन हल्लेखोर पसार झाला. जखमी अवस्थेतील पौळकर वाशिमच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.
दरम्यान, हल्लेखोर कोण होता? त्याने रंजना पौळकर यांच्यावर हल्ला का केला? याचा पोलिस तपास करत आहेत. तसेच पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.