मुळचे शिवसैनिक असलेले `हे` नेते पुन्हा स्वगृही
शिवसेना सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये गेलेले नेते त्या पक्षात जास्त रमले नाहीत.
कृष्णात पाटील, झी २४ तास, मुंबई : शिवसेना सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये गेलेले नेते त्या पक्षात जास्त रमले नाहीत. किंबहूना नवीन पक्ष सोडून त्यांनी पुन्हा एकदा पुर्वाश्रमीच्या पक्षात जाणं पसंत केलं. यातले काही जणांनी तर भाजपाच्या वळचणीला जाणं पसंत केलयं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना असे त्यांचे एक वर्तुळ पूर्ण झालं.
१५ वर्षानंतर स्वगृही परतलेल्या भास्कर जाधव यांच्याप्रमाणेच शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेकजण परत माघारी फिरत आहेत. पक्षप्रवेशासाठी मातोश्रीवर तर काँग्रेस, राष्ट्रवादीतल्या नेत्यांची रिघच लागलीय. यात मुंबईतील माजी आमदार आणि आजी-माजी नगरसेवकांचा संख्या सर्वाधिक आहे.
मनसेतून शिशिर शिंदे, शरद सोनावणे, दिलीप लांडे, शुभा राऊळ,राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर जाधव, धनराज महाले, उदय सामंत तर छगन भुजबळही पुन्हा शिवसेनेत परतण्याची चर्चांना उधाण आलयं. काँग्रेसमधून गणपत कदम, विनायक निम्हण, सुभाष बने,बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनीही परत शिवसेनेचा रस्ता धरला.
भाजपामध्ये प्रवेश केलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, कालिदास कोळंबकर, वसंत गीते, राजन तेली, प्रविण दरेकर या पूर्वाश्रमीच्या शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. तर नारायण राणेंचा भाजपा प्रवेशही निश्चित झाला आहे.
मुळचे शिवसैनिक असलेल्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं. मात्र ते जास्त दिवस म्हणजे मुळात शिवसैनिक असलेले यांच्यासह अनेक नेते इतर पक्षात गेले खरे, परंतु तिथं जास्त रमलेच नाहीत. तसंच सध्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेला अच्छे दिन आल्यानं या दोन्ही पक्षात उडी टाकण्यात हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आघाडीवर आहेत.