अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे नाराज खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार अशी चर्चा असताना आपण राष्ट्रवादीतच राहणार असे त्यांचे स्पष्टीकरण समोर आले होते. पण आता उदयनराजे हे भाजपावासी होणार हे निश्चित झाले आहे. १४ सप्टेंबरला दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच साताऱ्यातील 15 तारखेच्या मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रेत इतर कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत उदयनराजेंची भेट झाली. उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेनंतर पवारांची ही पहिली भेट होती. उदयनराजे यांनी पक्ष सोडू नये म्हणून राष्ट्रवादीने मनधरणी केली होती. काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण भाजपमध्ये येत नसल्याचे स्पष्ट केले होते, त्यानंतर आता त्यांनी पवारांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे बैठकीत उपस्थित होते. 



या बैठकीत उदयनराजेंना  अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे समजते. त्यांना मोठी जबाबदारी हवी होती मात्र तसे काही घडले नसल्याने त्यांनी तात्काळ भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत भाजपात न जाण्याची भूमिका घेणाऱ्या उदयनराजेंनी अचानक आपली भूमिका बदलली आहे.