COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : आपण बँकेत कोणताही भ्रष्टाचार केला नाही हे राज्यातील जनतेला सांगू इच्छितो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. बँकेचा व्यवहार 12 हजार कोटीच्या ठेवी असताना गैरव्यवहार 25 हजार कोटीचा कसा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आज ती बँक 250 ते 300 कोटीच्या नफ्यात आहे. जर बँक चांगली चालली नसती तर नफा मिळवला नसता. यासंदर्भातील नोटीस आल्यानंतर मी याबाबत वकीलांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. 


अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून पॅकेज दिले जाते, बँकेकडून कर्ज दिले जाते या संस्था टिकाव्या म्हणून हे करावं लागतं. कर्ज देताना संचालक देत नाहीत, यंत्रणा सगळ्या बाबी तपासते त्यानंतरच कर्ज दिले जाते हे देखील पवार यांनी स्पष्ट केले. 


आमचं म्हणणं मांडायला संधी न देता एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले, त्यानंतर ईडीने ही कारवाई केली. त्यामुळे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आम्हाला द्यावी लागतील, ती आम्ही द्यायला तयार आहोत असे अजित पवार म्हणाले. 


एका पक्षाची बँक नव्हती, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, शेकाप सगळे होते. पण शरद पवारांचा संबंध नसताना त्यांचे नाव कसं घेण्यात आलं ते कळण्याचा मार्ग नाही. ते संचालक नाहीत, सभासद नाही तरी त्यांचे नाव गोवण्यात आलं आहे.



महत्त्वाचे मुद्दे 


-सर्वसामान्यांच्या मनात हे ऐकल्यानंतर शंका येते पण मी सांगू इच्छितो यात आम्ही भ्रष्ट्राचार केला नाही याची चौकशी करावी. 
-राज्य सहकारी बँकेने कारखाने विकले त्यासाठी टेंडर बरोबर काढलं का? जाहीराती वर्तमानपत्रात आल्या का? कुणाला टेंडर भरू नको असं सांगितलं का? 
- चौकशी व्यवस्थित पूर्ण व्हावी
- माझ्यासमोर 24 कोटी रुपये दाखविण्यात आले आहेत, ते कशाचे दाखवण्यात आलेत
- मी लोन कमिटीच्या बैठकीला हजर नसायचो
- कुठलीही चौकशी करा, एक नया पैसा आम्ही घेतलेला नाही