शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.
उस्मानाबाद : शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे. उस्मानाबादच्या नायगाव पाडोळीत हा हल्ला झाला. हल्लेखोर वार करून फरार झालाय आहे. उस्मानाबाद - कळंब मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी गाडीतून उतरता क्षणी हल्लेखोरानं वार केला.
ओमराजेंना गंभीर दुखापत झालेली नाही, मात्र त्यांच्या घड्याळावर आणि हातावर जखम झाली आहे. हल्लेखोर बंडखोर आहे की विरोधकांमधील आहे हे समजू शकलेलं नाही. पाडोळी गावातल्या अजिंक्य टेकाळे तरुणानं हा हल्ला केल्याचं समजतं आहे. पण त्याने हा हल्ला का केला, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. हा हल्लेखोर वार करून फरार झाला आहे.
ओमराजेंचं आव्हान
'मी सुखरूप आणि व्यवस्थित आहे. माझ्यावर भ्याड चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने जखम खोल नाही. शिवसेना, भाजपा आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकाना विनंती आहे, की शांतता राखावी. आपल्याला विकासाचे राजकारण करायचं आहे, प्रचाराचे थोडेच दिवस शिल्लक आहेत. अजिबात लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही', असं आवाहन ओमराजेंनी केलं आहे.
मी सुखरुप आहे, तसंच कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी, असं आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हल्ला झाल्यानंतर गावात तणावाचं वातावरण आहे. हल्ला झाला त्या ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे.