विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : सगळ्या राज्यात बंडखोरीला पेव फुटलं असताना औरंगाबाद शहरही त्याला अपवाद नाही. अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरीला ऊत आलाय. औरंगाबादमधले बंडोबा शिवसेना-भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी ठरणार आहेत. औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवेसनेनं प्रदीप जैस्वाल यांना उमेदवारी दिली. भाजपा शहरअध्यक्ष किशनचंद तनवाणी तिथून इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद पश्चिममध्येही भाजपा बंडखोर शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकलेत. विद्यमान आमदार संजय शिरसाठ युतीचे अधिकृत उमेदवार असताना भाजपाच्या राजू शिंदेंनी बंडखोरी केलीय. दोघांच्या भांडणात एमआयएमचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


भाजपाचे राज्य मंत्री अतुल सावे यांच्या औरंगाबाद पुर्व मतदारसंघात शिवसेनेनं बंडखोरी केलीय. स्थायी समिती अध्यक्ष रेणुकादास वैद्य इथून अपक्ष उभे आहेत. 



काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात भाजपनं बंडाचा झेंडा उभारलाय.


ही बंडखोरी युतीसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना-भाजपानं बंड थमवलं नाही, तर याचा एमआयएम आणि आघाडीला फायदा होणार आहे. येत्या दोन दिवसांत बंडोबांची समजूत घालणं, हे युतीच्या नेत्यांसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे.