अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई : युती नावाचा 'रबर बँड' दिवसेंदिवस ताणला जातोय. भाजपा-शिवसेनेकडून दररोज एकमेकांना इशारे दिले जातायत. विधानसभा निवडणुकीत खरंच युती होणाराय का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरेचा वाद असो, नाही तर नाणार प्रकल्प, एकमेकांना डिवचण्याची एकही संधी भाजपा-शिवसेनेचे नेते सोडत नाहीयत. आरेचा नाणार होणार, असं भाकित उद्धव ठाकरेंनी केलं. त्यावर नाणार प्रकल्प होऊ शकतो, असं सांगून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला डिवचले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीआधी युती होण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीच्या पायऱ्या चढले. मग अमित शाहांच्या उपस्थितीत युतीची घोषणा झाली. त्यात नाणारमधील प्रकल्प स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला भरगच्च यशही मिळाले. 


पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची महत्त्वाकांक्षा उफाळून आली आहे. एकीकडं मी परत येईन... असा विश्वास मुख्यमंत्री वारंवार व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडं शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आदित्य ठाकरे सत्तेचा ठाणे पॅटर्न राबवण्याची भाषा करत स्वबळाचे संकेत देत आहेत.



प्रत्येकी १३५ जागा आणि मित्रपक्षांना १८ जागा असा फॉर्म्युला शिवसेनेनं सुचवलाय. तर भाजपा १६५, शिवसेना १०५ आणि  मित्रपक्षांना १८ जागा असा भाजपाचा आग्रह आहे. त्यातच मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यस्त असल्यानं जागावाटपाच्या चर्चेचं घोडंही पुढं सरकत नाही.


जागावाटपावरून शिवसेनेनं गुरगुरायला सुरुवात केलीय. नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशालाही सेनेचा विरोध आहे. आता भाजपा नेतृत्व ही गुरगुर सहन करणार की, आक्रमक पवित्रा घेत २०१४ प्रमाणं स्वबळावर निवडणूक लढवणार, याकडं लक्ष लागले आहे.