तुषार तपासे-अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे-सातारा : पुण्यातल्या कोथरुडमधून उमेदवारी जाहीर झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी आता स्वतःचं पुणे कनेक्शन शोधायला सुरुवात केलीय. चंद्रकांत पाटील हे उपरे उमेदवार असल्याची टीका होऊ लागलीय. त्याला उत्तर देताना आपली कर्मभूमी पुणे असल्याचं चंद्रकांत पाटील सांगू लागलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीवरुन कोथरुडमध्ये स्थानिकांमध्ये नाराजी आहे. चंद्रकांत पाटील लादलेले उमेदवार आहेत असं कोथरुडकरांना वाटतंय. कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांना विरोध करणारे पोस्टर्सही लागले.
 


पुण्यातील ठिकठिकाणी लागलेले पोस्टर्स

 


'सासुरवाडी पुण्याची...'


कोल्हापूरकर चंद्रकांत पाटलांनी आपण कसे पुणेकर आहोत हे सांगायला सुरुवात केलीय. १९८२ पासून आपण पुण्यात राहतोय. पुण्यातली गल्लीनगल्ली मला माहिती आहेत. १२ वर्षांपासून पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे. पुण्याचा संघटनमंत्री होतो. २ ते ३ महिन्यांपासून पुण्याचा पालकमंत्री आहे. बायको पुण्याची आहे हेही सांगायला दादा विसरत नाही.



गेल्या काही वर्षांत पुण्याचा चेहरा-मोहरा बदललाय. वास्तविक पाहता चंद्रकांत पाटलांच्या उपरेपणाची चर्चाच व्हायला नको होती. पण निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक आणि उपरे अशी चर्चा सुरु झाल्यानं, काहीही बोला पण मला पुणेकर म्हणा, असं म्हणण्याची वेळ चंद्रकांत पाटलांवर आलीय.