मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सर्व पक्षांच्या राजकीय सभा जोरात सुरु आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. बंडखोरी सुरु आहे. काँग्रेस पार्टी देखील पुन्हा सत्तेत येण्यास सज्ज आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी दृष्टीक्षेपात दिसत नसल्याने विरोधकांना आयत कोलीथ मिळालं होतं.  राहुल गांधी हे ऐन महाराष्ट्र निवडणुकीत परदेशात गेल्यामुळे त्यांच्यावर भाजप-शिवसेना नेते सडकून टीका करीत होते. पण काँग्रेसने त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची तारीख जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राहुल गांधी हे १३ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. लातूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी औसा तालुक्यातील लामजना येथे आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात माहीती दिली. राहुल गांधी यांची राज्यातील पहिली सभा ही मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील औसा येथे होणार असल्याचे जाहीर केले. १३ ऑक्टोबरला औसा येथे राहुल गांधी यांची पहिली सभा होणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.