मुंबई : भाजपा नेते एकनाथ खडसे हे 3 महिन्यांपासून संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते ठाण्यात आले होते. भाजपकडून मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, यामध्ये एकनाथ खडसे यांच्यासह अनेक विद्यमान मंत्र्यांची नावे नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही एकनाथ खडसे यांना दीर्घकाळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते. या सगळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातील संघर्षाची किनार होती. त्यामुळे आता भाजपकडून एकनाथ खडसे यांचे विधानसभेचे तिकीट कापून त्यांना पूर्णपणे बाजूला सारण्यात येणार का, अशी चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी उमेदवारी यादीत नाव नसूनही काल मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला होता. आपण भाजपशी एकनिष्ठ असल्यामुळे आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, ही आशा आता फोल ठरताना दिसत आहे. तेव्हा एकनाथ खडसे बंडखोरी करण्याची शक्यताही भाजप नेतृत्त्वाने लक्षात घेतली आहे. 


एकनाथ खडसे यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. या पार्श्वभुमीवर खडसेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांची सभा घेतली. यावेळी खडसेंना उमेदवारी न दिल्यास मी राँकेल घेऊन स्वत:ला जाळून घेईन असे एका कार्यकर्त्याने खडसे यांना फोनवर सांगितले. 


एकनाथ खडसे यांची पक्षनिष्ठा आज वेळोवेळी दिसून येत आहे, तेवढीच पक्षाकडून होणारी अवहेलनाही नजरेआड करता येत नाहीय. कारण भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. कोणताही गैरप्रकार होवू नये म्हणून खडसे घराबाहेर कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसले आहेत. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्याला तिकिट मिळणार नसल्याचे संकेत दिले आहेत, तरी देखील शांतता आणि संयम ठेवा असा सल्ला एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.


दुसरीकडे आपल्याला तिकिट न मिळाल्यास आपली कन्या रोहिणी खडसे यांना तिकिट मिळाल्यास एकनाथ खडसे ते नाकारणार नाहीत, असं देखील संकेत एकनाथ खडसे यांच्या बोलण्यात दिसून येतात.


मात्र कार्यकर्ते आक्रमक होत आहेत, कारण उद्या दुपारपर्यंत अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. एकनाथ खडसे यांना तिकिटासाठी एवढी प्रतिक्षा करावी लागत असेल, तर एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आणि विरोधकांना दाखवून द्यावं, असं आवाहन खडसेंना कार्यकर्ते करत आहेत.